रवीन्द्रनाथांचा राष्ट्रवाद -
आज आपण ज्या कालखंडात वावरत आहोत आणि ज्या वातावरणात जगतोय त्याचा विचार करता भूतकाळातील एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा साक्षेपी विचार करणे जवळजवळ अशक्य ठरावे अशीच परिस्थिती आहे. जो समाज किंवा समाजातील बहुसंख्याक समुदाय जेव्हा कुठल्याशा अस्मितेच्या प्रभावाखाली असतो तेव्हा तर विवेकाधारित अभ्यास, संशोधन, चिकित्सा आदी गोष्टी समाजातून हद्दपारच झालेल्या असतात. त्यातही सोयीची व्यक्ती आणि तिचे सोयीचे तेवढे तत्त्व याचा आपल्या फायद्यासाठी वापर करणे अगदी सहज झालेले आहे. ज्या समाजात ‘बाजूचे’ अथवा ‘विरुद्ध’ अशीच मांडणी केली जाते त्या समाजात निरपेक्षपणे एखाद्या महनीय व्यक्तीच्या कार्याचे, तिच्या गुणांचे, तिच्यातील कमतरतांची अथवा त्या व्यक्तीच्या विचारांची चिकित्सा करणे कठीण असते. अशी चिकित्सा आणि अभ्यास समाजाला मान्य नसतो आणि तो त्यांना पचतही नाही. अभ्यासकांनादेखील उगवत्या सूर्याला पाहूनच विषय ठरवण्याची मुभा असते. त्यामुळे कुणी एक आदरणीय वा पूजनीय ठरतो, तर दुसरा कुणी एक समाजाला नकोसा होतो. या साऱ्या प्रकारास राजकारण आणि जातीय व धार्मिक अस्मिता या गोष्टी संपूर्णत: जबाबदार आहेत. तशातच चिकित्सक अभ्यासाला लागणारी साक्षेपी तटस्थतेची सार्वत्रिक उणीव सध्या आपल्याकडे आढळून येते. त्यामुळे महात्मा गांधी असोत की स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असोत की छत्रपती शिवाजी महाराज- या किंवा इतर महनीय व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची चिकित्सा करताना विचार व विवेकापेक्षा भावनेला अधिक स्थान मिळते. परिणामी त्यांच्या कार्याचे योग्य असे मूल्यमापन राहूनच जाते.
असाच काहीसा प्रकार रवीन्द्रनाथ टागोरांच्या संदर्भातदेखील घडताना दिसतो. ‘नोबेल पारितोषिक मिळालेले एक महान कवी’ या त्यांच्या उल्लेखात आपला भारतीय म्हणून अभिमान झळकतो, परंतु पाश्चात्त्य जगत त्यांच्याकडील थोर कवीस ज्या प्रकारे मानबिंदू म्हणून स्वीकारते तसे आपल्याला रवींद्रनाथांना स्वीकारणे शक्य होत नाही. भारतरत्न पं. रविशंकर एके ठिकाणी म्हणाले आहेतच की, ‘रवीन्द्रनाथ जर पाश्चात्त्य जगात जन्मले असते तर शेक्सपिअर आणि गोथेसारखे मिरवले गेले असते.’ अर्थात असे भाग्य रवीन्द्रनाथांना पश्चिम आणि पूर्व बंगालमध्ये लाभले आहेच. परंतु बंगाली भाषेच्या अपरिचिततेमुळे इतर प्रांतांत मात्र कवी म्हणून त्यांच्याकडे काहीसे दुर्लक्ष झालेले दिसते. त्यांच्या ‘गीतांजली’ची ख्याती जगभर पसरलेली आहे. पण त्या तुलनेत त्यांचे इतर कवितासंग्रह ‘गीतांजली’पेक्षाही सरस असूनदेखील त्याकडे वाचक आणि अभ्यासकांचे दुर्लक्ष झालेले दिसते. तथापि, एक तत्त्वज्ञ म्हणून त्यांच्या विचारांचा अभ्यास आजच्या घडीला अत्यावश्यक ठरतो.
रवीन्द्रनाथ समजून घेणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकूणच चतुरस्र स्वरूपामुळे अवघड होते. रवीन्द्रनाथ कवी होते तसेच ते तत्त्वज्ञही होते. राजनीतिज्ञ होते तसेच शिक्षणतज्ज्ञही होते. जमीनदार होते तसेच हाडाचे कार्यकर्तेही होते. आपल्या राष्ट्रावर त्यांचे प्रेम होते तसेच ते आंतरराष्ट्रवादीही होते. प्रयोगशीलतेप्रमाणेच ते परंपरेचे पाईकही होते. रवीन्द्रनाथ जसे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहेत, तसेच आधुनिक पाश्चात्त्य प्रगतीचेदेखील ते प्रशंसक होते. अध्यात्म आणि विज्ञान यांची ते फारकत करत नाहीत. एकीकडे ईश्वरभक्ती आणि दुसरीकडे स्थितीप्रिय धार्मिकतेविरुद्ध बंड असे काहीसे संमिश्र पदर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतात. अशा व्यामिश्र व्यक्तिमत्त्वामुळे रवीन्द्रनाथांना समजून घेणे त्यांच्या समकालीन भारतीय आणि पाश्चात्त्य समाजालादेखील कठीण गेले. आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही.
आजच्या घडीला ऐरणीवर असलेला मुद्दा म्हणजे ‘राष्ट्रवाद’! एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात जगभरात ‘राष्ट्रवाद’ पुन्हा अवतरलेला दिसतो. अमेरिका, ब्रिटन यांसारखे प्रगत म्हणवून घेणारे देश असोत की मध्य आशियातील कट्टरपंथीय देश; उत्तर कोरिया असो की आपला भारत असो; ‘राष्ट्रवाद’ हा कळीचा मुद्दा झालाय. वसाहतकाळात राष्ट्रवाद हा सद्गुण मानला जाणे स्वाभाविकच होते. प्रत्येक गुलाम देशाला स्वातंत्र्याचा ध्यास असणे अगदीच नैसर्गिक होते. प्रत्येक व्यक्ती ही जन्मत:च स्वतंत्र आहे आणि तो अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. याच स्वातंत्र्याच्या ध्यासापोटी एक अलौकिक असा स्वातंत्र्यलढा भारतात उभा राहिला आणि भारताने स्वातंत्र्य मिळवले. भारताच्या राष्ट्रवादी चळवळीला स्वातंत्र्याचे मूल्य आधारभूत होते. त्याउलट, त्या काळातील बहुतांश देशांचा राष्ट्रवाद हा आक्रमक आणि स्वार्थी होता. अशा युरोपीय राष्ट्रवादाने जगाला दोन वेळा महायुद्धाच्या खाईत लोटले. आज जरी अशा महायुद्धाची शक्यता दिसत नसली तरी राष्ट्रवादाच्या अतिरेकाने सत्तास्पर्धा आणि शस्त्रस्पर्धा पाहायला मिळते आहे. त्यापुढे जाऊन राष्ट्रवादाच्या नावाखाली काळाचे चक्र उलटे फिरवले जात आहे.
रवीन्द्रनाथांचा कालखंड हा १९ व्या शतकाचा उत्तरार्ध आणि २० व्या शतकाचा पूर्वार्ध! जगाचा इतिहास सांगतो की, कधी नव्हे इतका प्रखर आणि आक्रमक राष्ट्रवाद या काळात प्रत्येक खंडातील बहुतांश देशांत उदयाला आला आणि परमोच्च स्थानी पोहोचला. त्यातल्या त्यात युरोपीय देश या भावनेने जास्त पछाडले होते. याच युरोपीय सत्ता जेव्हा जेते म्हणून इतर खंडांतील देशांवर राज्य करू लागल्या तेव्हा त्यांच्या वसाहतीचा भाग असलेल्या देशांमध्येही राष्ट्रभावना प्रबळ होऊ लागली. एकंदरीत पाहता तत्कालीन राजकीय आणि विशेषत: आर्थिक परिस्थितीमुळे राष्ट्रवाद वाढला, तगला आणि र्सवकषपणे प्रभावशाली झाला.
रवीन्द्रनाथ हे इंग्रजी अंमल आणि शिक्षण यामुळे तसेच भारतीय समाजास झालेल्या युरोपीय ज्ञान-विज्ञानाच्या परिचयामुळे जे नवजागरण (Renaissance) देशात घडून आले त्याचे अपत्य! भारतातील साहित्य, समाजकारण, सुधारणा, राजकारण, वैचारिक परंपरा, कलाविश्व यांना परिचित असलेले रवीन्द्रनाथ पाश्चात्त्यांना ‘गीतांजली’द्वारे परिचित झाले. त्या राष्ट्रांमध्ये त्यांना ‘न भूतो न भविष्यति’ अशी प्रसिद्धी लाभली, सन्मान लाभले. रवीन्द्रनाथांना या राष्ट्रांचा आणि तिथल्या समाजाचा जसजसा अधिकाधिक परिचय होत गेला तसे त्यांना हे देश, त्यांची मानसिकता, संस्कृती आणि भारतीय समाज आणि संस्कृती यांच्यातील साम्य-भेद लक्षात आले.
१९१२ नंतरच्या कालखंडात रवीन्द्रनाथांचे युरोपीय वा अमेरिकी देशांमधील व्याख्याने, मुलाखती, लेखन आणि चिंतनाचा विषय ‘राष्ट्रवाद’ हाच प्रामुख्याने होता. ब्रिटिश अधिपत्याखालील भारत प्राणपणाने स्वातंत्र्यासाठी लढत असतानाही (आणि रवीन्द्रनाथांचे आपल्या देशावरील प्रेम नि:संशय असूनही) राष्ट्रवादाबाबत ते सावध आणि खूपदा प्रतिकूल भूमिका मांडताना दिसतात. एक गोष्ट याच ठिकाणी सांगितली पाहिजे, की राष्ट्रवादासंबंधी रवीन्द्रनाथांची भूमिका अगदी सुरुवातीपासून एकच आणि ठाम राहिलेली आहे. भारतीय अथवा युरोपीय लोकांच्या अनुनयाचा, प्रशंसेचा वा त्यांच्या टीकेचा रवीन्द्रनाथांवर कुठलाही प्रभाव पडलेला दिसत नाही. अतिरेकी राष्ट्रवाद हा त्यांच्या टीकेचा विषय होता. ज्या जपानी संस्कृती आणि कलांविषयी त्यांना अतोनात आदर होता, त्याच जपानने चीनवर आक्रमण केले असता त्यांनी कडक शब्दांत त्याचा निषेध केला होता. जर्मनी आणि इटली या नाझीवादी आणि फॅसिस्ट देशांमध्ये रवीन्द्रनाथांना प्रचंड लोकप्रियता मिळाली तरी तेथील अमानवीय राष्ट्रवाद त्यांना रुचणारा नव्हता. त्यांना इंग्रजांच्या सहिष्णुतेविषयी विश्वास होता, परंतु त्याच वेळी ब्रिटिशांच्या शोषण करणाऱ्या कारभाराविषयी चीडही होती. आधुनिक काळातील राष्ट्रवादाने मानवी जीवनातील प्रत्येक क्षेत्रात केलेले आक्रमण त्यांना मान्य नव्हते. त्यांनी राष्ट्रवादासंबधी आपले विचार अनेक व्यासपीठांवरून आणि लेखनातून स्पष्टपणे मांडले.
रवीन्द्रनाथांच्या समोर राष्ट्रवादी भावनेने भारलेले इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, इटली असे युरोपीय देश आहेत. याच देशांच्या पावलांवर पाऊल टाकून भौतिक प्रगतीसाठी आपल्या मूळ संस्कृतीशी काडीमोड घेणारा जपान आहे. पलीकडे आपले आर्थिक हितसंबंध जपणारे अमेरिका आणि कॅनडा आहेत. सोबत या प्रगत देशांचे अंकित आणि वसाहती असलेले देश आहेत; ज्यांचे भरणपोषण हे पाश्चात्त्य भाषा, विचार, ज्ञान, तंत्रज्ञान आणि संस्कृतीवर सुरू आहे. एकूणच राष्ट्रवाद हा माणसाचे सर्वोच्च मूल्य ठरलेले आहे. भारतदेखील यास अपवाद नाही. अशा वातावरणात रवीन्द्रनाथ ठामपणे सांगतात की, राष्ट्रवाद हा कृत्रिम आणि अमानवीय आहे. विशेषत: भारतीय संस्कृती आणि समाजरचनेत या आणि अशा राष्ट्रवादाला कुठलेही स्थान नाही. त्यांच्या मते, ‘राष्ट्र’ ही संकल्पनाच मुळात पाश्चात्त्य आहे. भारत हा शतकानुशतके एक सुसंघटित समाज म्हणून अस्तित्वात आहे. हा समाज अगदी प्राचीन काळापासून एक सुस्थिर, स्वयंपूर्ण आणि परस्परावलंबी जीवन जगत आहे. या समाजात स्वत:ची न्यायव्यवस्था आहे. परिपूर्ण अशी अर्थव्यवस्था (ग्राम स्वावलंबन) आहे. धर्म आणि रीती यांची सांगड मानवी जीवनाचे नकारात्मक बाबींपासून रक्षण करीत आहे. राजकारण हा केवळ समाजाचे कारण सुरळीत चालावे असा घटक आहे. तो माणसांवर र्सवकष प्रभाव टाकत नाही. राजा कोणीही असो, राज्य कोणाचेही असो; राजाच्या धर्माचा, जातीचा, होणाऱ्या युद्ध, लढायांचा या समाजावर परिणाम होत नाही, किंवा या समाजाची घडी त्याने विस्कटत नाही.
रवीन्द्रनाथांच्या मते, भारतीय समाज हा निरंतर परस्पर समन्वयाच्या प्रक्रियेतून जात होता आणि जात आहे. कारण भारतासमोरील प्रत्यक्ष प्रश्न हा वांशिक विषमतेचा होता आणि आहे. भारतात बाहेरून येणारे आक्रमक कालांतराने येथेच सम्मिलित झाले. पुन्हा नवनवीन वंश येथे येतच राहिले आणि समरसतेची ही प्रक्रिया सुरूच राहिली. शिवाय, ‘जात’ संकल्पनेतून येणारी विषमता हा या समाजाचा कळीचा आणि दुखरा मुद्दा आहे आणि त्यावरदेखील उत्तर शोधण्याची निरंतर प्रक्रिया चालू आहे. थोडक्यात, समाज म्हणून एकजिनसी असणे ही भारताची ओळख आहे. भारत हा राष्ट्र असण्यापेक्षा मानवी बंधांत बांधला गेलेला समाज आहे. अनेकत्वातून साधली गेलेली एकसंधता, परस्परांच्या श्रद्धा, भक्ती, परंपरांबद्दल असलेला आदर, सहअनुभूती ही या समाजाची वैशिष्टय़े आहेत.
रवीन्द्रनाथांच्या मते, याउलट युरोपीय राष्ट्र ही संकल्पना आर्थिक आणि राजकीय अपरिहार्यतेतून जन्माला आली. कुठल्याही व्यक्तीला किंवा राष्ट्राला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी दोन पर्याय असतात. एक म्हणजे परस्पर संघर्षांचा आणि दुसरा- परस्पर सहकार्याचा! परंतु आर्थिक वा राजकीय वर्चस्वाच्या झगडय़ातून सहकार आणि सामंजस्यापेक्षा अविश्वास आणि भीती निर्माण होते, आणि त्यापाठोपाठ येते- हिंसा! या समाजात आर्थिक नफ्याची प्रेरणा बलवान ठरली. आणि सर्वच मानवी संस्थांचे राजकीयीकरण झालेले असल्यामुळे युरोपात संघर्ष हा अटळच होता. भारतीय समाज कुठल्याशा कालखंडात सामाजिक कारणांनी अवनत झाला तरी आत्मिक उन्नयनाची त्याची आस कायम राहिली. भौतिक प्रगतीपेक्षा व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती या समाजासाठी मूळ प्रेरणा ठरली.
राष्ट्रवाद हा त्या- त्या राष्ट्राच्या भौतिक प्रगतीला चालना देत असला तरी माणुसकीच्या आणि विश्वबंधुतेच्या कसोटीवर तो पूर्णत: अपयशी ठरताना आपण पाहिला आहे. गेल्या काही दशकांमध्ये ‘जागतिकीकरण’ हा मंत्र ठरला होता. मात्र, त्यामागे अखिल मानवाचे उन्नयन असा काही आदर्श विचार नव्हता, तर केवळ आर्थिक हितसंबंध होते. रवीन्द्रनाथ ‘राष्ट्रवाद’ हा अमानवीय म्हणून नाकारतात. कुठलाही राष्ट्रवाद हा मुळात कुठला तरी भेद (कमीत कमी भौगोलिक सीमा) मान्य केल्याशिवाय असू शकत नाही. असा भेद कवी आणि तत्त्वज्ञ म्हणून ते मान्य करत नाहीत.
राष्ट्राबद्दल रवीन्द्रनाथ एक वेगळीच मांडणी करतात. त्यांच्या मते, राष्ट्र हे राजकीय आणि आर्थिक संघटन आहे- ज्याच्या स्थापनेची त्या देशातील जनतेसाठी भौतिक गरज असते. मात्र, रवीन्द्रनाथ असेही मांडतात की, समाज हा केवळ भौतिक गरजेपोटीच घडत नाही, तर समाज हा मानवी नात्यांचे नैसर्गिक नियमन असते. हजारो वर्षांपासून भारत हा ‘राष्ट्र’ या संकल्पनेपासून मुक्त असा समाज होता; जो शांतपणे कुठल्याही राजकीय महत्त्वाकांक्षेशिवाय अनंत, अनाहत तत्त्व आणि व्यक्ती यांच्या परस्परसंबंध आणि अनुबंधाच्या अनुभूतीने जगत आलेला होता. भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक परिपूर्णता हे भारतीय समाजाचे लक्षण होते. समाजात असलेले लसलसते बंध हे राष्ट्राच्या चौकटीत निर्जीव होतात. याचा साधा अर्थ असा की, राष्ट्र ही मूलत: आर्थिक आणि राजकीय संकल्पना असल्यामुळे फायदा, सत्ता, वर्चस्व आदी गोष्टी आपसूकच मानवी मनावर अधिराज्य करू लागतात. भारताची फाळणी असो वा भाषावार प्रांतरचना; या कुठल्याच गोष्टी सहज, शांतपणे, मनोभेद व हिंसा टाळून झालेल्या दिसत नाहीत.
दुसऱ्या राष्ट्राला १९ व्या शतकाप्रमाणे राजकीय गुलाम करणे वा आजच्या काळाप्रमाणे आर्थिक गुलाम करणे यामागील प्रेरणा खचित मानवीय नाहीत. असा राष्ट्रवाद रवीन्द्रनाथांना अपेक्षित नाही. रवीन्द्रनाथ एका ठिकाणी लिहितात, की ‘पाश्चिमात्य राष्ट्रांचा पाया मुळात संघर्ष आणि जय-पराजयावर आधारलेला होता. सामाजिक सहकार हा त्यांचा पाया नव्हता, किंवा आध्यात्मिक आदर्शवाद त्यांची प्रेरणा नव्हती.’ रवीन्द्रनाथांच्या मते, राष्ट्रवाद हा नेहमीच बळावर (पॉवर) आधारलेला असतो. राष्ट्रवाद हा इतक्या प्रभावशाली पद्धतीने मनावर बिंबवला जातो, की त्यात सारासार विचारशक्तीचा ऱ्हास होतो. म्हणूनच ते राष्ट्रवादाला ‘अॅनेस्थेशिया’ संबोधतात. रवीन्द्रनाथ पुढे जाऊन असेही नमूद करतात की, आधुनिक काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेली प्रगती राष्ट्रवादाच्या वाढीस पोषकच ठरते. पाश्चात्त्य स्वातंत्र्याच्या कल्पनेत केवळ भौतिक स्वातंत्र्य अपेक्षित होते. मात्र, रवीन्द्रनाथांच्या स्वातंत्र्य-कल्पनेत भौतिक स्वातंत्र्यासह आत्मिक स्वातंत्र्यही अपेक्षित असते. अर्थात कुठल्याही वेष्टनातील राष्ट्रवाद हा आत्मिक स्वातंत्र्याला बाधकच असतो.
रवीन्द्रनाथ कवी आहेत. स्वातंत्र्य, सौंदर्य आणि आनंद हा त्यांच्या कवित्वाचा मूळ गाभा आहे. ही तिन्ही तत्त्वे अभिन्न आहेत. स्वातंत्र्याअभावी आनंद आणि सौंदर्य अशक्य, तसेच आनंदाचा अभाव म्हणजे कुरूपता असते. जेथे स्वार्थ, लोभ आहे तेथे स्वातंत्र्याचे तत्त्व सहजच पायदळी तुडवले जाते. रवीन्द्रनाथ आपल्या कवितांमध्ये या तिन्ही तत्त्वांचा उद्घोष करतात. असे करताना त्यांच्यावरील प्रभाव स्पष्ट होतात. भारतीय परंपरेमध्ये कवी हा ऋषी मानला जातो. रवीन्द्रनाथ ऋषितुल्य आहेतच. ते उपनिषद-परंपरेतील कवी आहेत. त्यांच्यावर असलेला उपनिषदांचा प्रभाव सर्वमान्य आहे. उपनिषदांतील प्रार्थना जशा सर्वाच्या कल्याणासाठी आहेत, तशा रवीन्द्रनाथांच्या कविताही साऱ्यांच्या आनंदासाठीचे मागणे आहे. आपल्याकडील संतसाहित्याची परंपरा आणखी वेगळे काय दर्शवते? ज्ञानेश्वरांचे पसायदान आणि रवीन्द्रनाथांच्या मांगल्याच्या स्तोत्रांमध्ये एक समान दुवा आहे. त्यांच्यासाठी मानवजात ही सर्वथा अखिल आणि अभंग आहे. त्यांची निसर्गावर अतूट श्रद्धा आहे, प्रेम आहे. हा निसर्ग त्यांना एकसंधता, एकात्मता शिकवतो. भारतीय तत्त्वज्ञान ज्या ‘एकम् सत् विप्रा बहुधा वदन्ति’ तत्त्वाचा पुरस्कार करते ते तत्त्वज्ञान माणसामाणसांतील अथवा माणूस आणि निसर्गातील भेद किंवा परकेपणा कसा मान्य करू शकते? रवीन्द्रनाथांचा ‘आंतरराष्ट्रीयवाद’ हा खऱ्या अर्थाने ‘विश्ववाद’ आहे!
रवीन्द्रनाथांची राष्ट्रवादाला छेद देणारी भूमिका त्यांच्या समकालीनांना जितकी धक्कादायक होती, तेवढीच ती आजच्या काळात स्वीकारली जाणेही अवघड आहे. आज जागतिकीकरणाचा कितीही उदोउदो केला तरी त्यामागील प्रेरणा आर्थिक स्वार्थाच्याच आहेत. माणसाचे आत्मिक स्वातंत्र्य आणि त्याच्या अस्तित्वाचा अर्थ मान्य करणारी परिस्थिती मात्र त्यात अनुस्यूत नाही. अशा परिस्थितीत रवीन्द्रनाथांचे विचार समजून घेणे अधिक आवश्यक आहे.